Department of Marathi (मराठी विभाग)
Message of HOD
(मराठी विभाग प्रमुखांचा संदेश)


प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
सस्नेह नमस्कार!
जे. ई. एस. महाविद्यालयाच्या मराठी विभागात मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करतो. पदवीच्या अभ्यासासाठी तुम्ही 'मराठी' या विषयाची निवड केली, हा अत्यंत अभिमानास्पद आणि तुमच्या उज्वल भविष्याची पायाभरणी करणारा निर्णय आहे.
मराठी भाषेची समृद्ध परंपरा
मराठी ही केवळ एक भाषा नसून ती आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपला अभिमान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, महानुभाव पंथ यांच्यापासून ते आजच्या आधुनिक आणि जागतिकीकरणाच्या काळातील साहित्यापर्यंत मराठी भाषेला शेकडो वर्षांची दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. मराठी भाषेने केवळ माणसाला माणुसकी शिकवली नाही, तर समाजाला एक प्रगल्भ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनही दिला आहे. ही भाषा तुमच्या विचारांना आणि भावनांना एक भक्कम अधिष्ठान देईल.
मराठी विभागाची गौरवशाली परंपरा आणि योगदान आपल्या जे. ई. एस. महाविद्यालयातील मराठी विभागाची सुरुवात इ.स. १९५८ मध्ये झाली. या विभागाला अत्यंत विद्वान आणि समर्पित विभागप्रमुखांची मोठी परंपरा लाभली आहे. विभागाचे पहिले प्रमुख आणि जालन्यातील पहिले पी.एचडी. धारक डॉ. शिवाजी गऊळकर (१९५८-१९९३) यांनी या विभागाची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या पश्चात प्रा. प्रभाकर कुलकर्णी (१९९३-२००१) आणि डॉ. के. जी. सोनकांबळे (२००१-२०१९) यांनी आपल्या अभ्यासू मार्गदर्शनातून ही ज्ञानपरंपरा तितक्याच सक्षमपणे पुढे नेली आणि विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन अभिरुची जोपासण्याचे मोलाचे कार्य केले. २०१९ पासून ते आजतागायत मी विभागप्रमुख म्हणून या महान परंपरेचा पाईक बनून कार्यरत आहे आणि आधुनिक काळातील आव्हानांनुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
या सर्व मान्यवरांच्या योगदानातून विभागाने आजवर समाजाला अनेक प्रतिभावंत साहित्यिक, संशोधक आणि सुसंस्कृत नागरिक दिले आहेत. आज आपला विभाग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) नुसार विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षण देत नाही, तर त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांना आधुनिक काळातील रोजगाराभिमुख कौशल्येही शिकवत आहे.
भविष्यातील करिअरच्या संधी
मराठी विषय घेऊन पुढे काय? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. परंतु, आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि माहितीच्या युगात मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या असंख्य सुवर्णसंधी उपलब्ध आहेत:
स्पर्धा परीक्षा: पीएसआय, एसटीआय या पदांसाठीच्या मुख्य परीक्षेत तसेच एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांमध्ये मराठी विषयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यूपीएससीला तुम्ही मराठी विषय निवडून त्याचे पेपर देऊ शकता.
प्रसारमाध्यमे: वृत्तपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, आणि दूरदर्शन यांसारख्या माध्यमांमध्ये बातमीदार, अग्रलेख लेखक, आणि निवेदक म्हणून काम करता येते.
भाषांतर आणि दुभाषिक: दोन भाषांचा समन्वय साधण्यासाठी दुभाषिकांची आणि उत्तम अनुवादकांची शासकीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी गरज आहे.
डबिंग आणि मनोरंजन: कार्टून, चित्रपट किंवा वेबसिरीजचे अन्य भाषेतून मराठीत रूपांतर करण्यासाठी डबिंग क्षेत्रात उत्तम पैसे कमवता येतात, तसेच पटकथा व गीतलेखनातही भरपूर वाव आहे.
मुद्रितशोधन आणि डीटीपी: प्रकाशन संस्था व माध्यमांमध्ये मजकुराचे अचूक प्रमाणलेखन तपासणारे मुद्रितशोधक आणि डीटीपी (DTP) ऑपरेटर यांना मोठी मागणी असून, हे काम घरबसल्याही करता येते.
डिजिटल माध्यमे: आजच्या काळात विविध विषयांवर ब्लॉग लेखन (Blogging), कन्टेन्ट रायटिंग, आणि जाहिरात लेखन यातून उत्तम रोजगार आणि सन्मान मिळतो. राजकीय पक्ष आणि कंपन्यांच्या आयटी सेलमध्येही (IT Cell) मराठी लेखकांना मोठी मागणी आहे.
शिक्षण आणि प्रकाशन: महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण देणारे शिक्षक, प्राध्यापक होण्याची संधी आहे, तसेच स्वतःचा प्रकाशन व्यवसायही सुरू करता येतो.

विद्यार्थी मित्रांनो,
मराठी विषय हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करेल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवेल. तुम्ही घेतलेला हा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी आमचा मराठी विभाग आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील.
पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

प्रा. डॉ. यशवंत सोनुने
विभाग प्रमुख,
मराठी विभाग, जे. ई. एस. महाविद्यालय, जालना.

Copyright © 2021. This is the official Website of J. E. S. College, Jalna (M. S.) India